Book Review: छावा - एका शूर सिंहाच्या शूर छाव्याची गोष्ट
शीर्षक - छावा
लेखक - शिवाजी सावंत
छत्रपति शिवाजी हे नाव अणि त्यांचे कार्य आपल्या जेवढ्या ओळखीचे आहे तेवढंच संभाजी राजाचं आयुष्य व कार्य अनेक कारणामुळे संदिग्ध आहे. लहानपणापासून शिवाजी राजांच्या गोष्टी ऐकून त्यांच्या बद्दल मनात अभिमान आणि आदर दोन्ही निर्माण झालेला आहे. शिवाजीबद्दल वाचताना मनात तेवढंच कुतूहल संभाजी राजे आणि त्यांची कारकीर्द निर्माण करते.
जर कोणाला खरोखर काय झालेले हे जाणून घ्यायचं असेल तर छावा ही शिवाजी सावंत ह्यांची कादंबरी वाचावी. शेवटपर्यंत मनाला जखडून ठेवणारी आणि आपल्या इतिहासकडे जवळ नेणारी अशी ही अप्रतिम कलाकृति आहे. प्रत्येक मराठी माणसाने वाचायलाच हवी अशी ही छाव्याची कहाणी आहे.
लहान असताना शिवाजीराजांबरोबर आग्र्याला गेलेले सम्भाजी आणि जीवास धोका आहे हे जाणून फ़क़त शिवाजींच्या सांगण्यावरून मागून वेष बदलून आलेले संभाजी, मिर्झाराजे ह्यांच्या गोटात ओलिस म्हणून राहिलेले संभाजी, मरण यातना भोगणाऱ्या शिवाजीना भेटता येत नाही म्हणून तळमळणारे संभाजी, शिवाजीवर विषप्रयोग करणाऱ्यांना खड़सावणारे संभाजी, जिजाऊच्या मृत्युवेळी धाय मोकलून रडणारे संभाजी, गोदावरी ह्या बाईच्या मृत्यूसाठी स्वतःला कारणीभूत मानणारे आणि तिच्या ह्या यातनेसाठी मूळ कारण असलेल्या सोयराबाईंचे नाव सदरेपुढे सांगण्यास कचरणारे संभाजी, त्यांच्यावर विषप्रयोग करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली देणारे आणि चुकून कटात सामिल झालेल्याना माफ़ करणारे संभाजी, रामराजांवर जिवापाड प्रेम करणारे संभाजी, महाराष्ट्र जिंकून कर्नाटकपर्यन्त मजल मारणारे संभाजी, उभ्या कारकिर्दीत कुणी जिंकू न शकलेल्या जंजिऱ्याला वेढा घालून खच्ची करणारे संभाजी, अपमान सहन न होऊन दिलेरच्या गोटात जाणारे संभाजी आणि आपली चूक समजल्यावर परत येणारे संभाजी, औरंगजेबाच्या कचाट्यात सापडल्यावरही मराठी मान न तुकवणारे संभाजी.
ह्या पुस्तकात सम्भाजीराजांची अशी कितीतरी रूपे दर्शवली आहेत. पुस्तक संपेपर्यंत मन फक्त एका गोष्टींकडे ओढ़ घेते. त्या काळात संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली काहीतरी अचाट करता आलं असतं, तर जीवन धन्य झालं असतं.
Very nicely written...
ReplyDelete